राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जिजाऊ जन्म स्थळ विकास आराखड्यासाठी आ. सिद्धार्थ खरात यांचा विधानसभेत आवाज – निधी, सुविधा आणि संवर्धनासाठी खास मागणी

सिंदखेड राजा/ प्रतिनिधी दि १८ महाराष्ट्र
विधानसभेत राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या पाचाड येथील समाधीस्थळ व सिंदखेड राजा येथील जन्मस्थळाच्या विकासाबाबत महत्त्वपूर्ण चर्चा रंगली. आमदार सिद्धार्थ खरात यांनी लक्षवेधी सूचना क्रमांक तीन अंतर्गत या विषयावर ठोस मुद्दे उपस्थित करत शासनाचे लक्ष वेधले.#
आ. सिद्धार्थ खरात यांनी जिजाऊ माँसाहेबांच्या समाधीस्थळी पायाभूत सुविधा नसल्याकडे विशेष लक्ष वेधले.त्यांनी स्पष्टपणे सांगितले की पाचाड येथे आजही उपहारगृह, स्वच्छतागृहे किंवा हॉलसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. तसेच तेथील राजवाडा भग्न अवस्थेत आहे आणि सिंदखेडराजा येथील 454 कोटींचा विकास आराखडा अद्यापही कागदावरच आहे, प्रत्यक्षात काहीच काम झालेले नाही.
आ.खरात यांच्या प्रश्नांना उत्तर देताना पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी स्पष्ट केले की,
पाचाड येथील शिवसृष्टीसाठी ₹50 कोटींचा निधी मंजूर झाला असून, तो जिल्हाधिकारी, रायगड यांच्या कडे आहे.
परंतु हे ठिकाण भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अखत्यारीत असल्यामुळे काही कामांसाठी विशेष परवानग्यांची आवश्यकता आहे.
सिंदखेडराजा येथील पाच स्मारकांच्या दुरुस्ती आणि जतनासाठी ₹12 कोटी व ९.४९कोटी निधी मंजूर झाला असून, निधी कमी पडू नये यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.
विविध संबंधित विभागांची एकत्र बैठक घेऊन विकास आराखड्यांची कार्यवाही गतीने करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.
परंतु यावर आमदार सिद्धार्थ खरात आणि इतर विधानसभा सदस्यांनी संतोष व्यक्त न करता ठामपणे सांगितले की, फक्त निधी मंजूर केल्याने कामं होत नाहीत, ती प्रत्यक्षात राबवली जातात का हे महत्त्वाचं आहे. शिवप्रेमी आणि इतिहासप्रेमी जनतेच्या भावना तीव्र असून, कामांना तातडीने गती देणे आवश्यक असल्याचे त्यांनी बजावले.