जिजाऊ जन्मोत्सवाला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते, तर वैष्णवगडावर पालकमंत्र्यांच्या हस्ते महापूजा व्हावी..!आ.मनोज कायंदे यांची विधानसभेत मागणी

सिंदखेडराजा, ( प्रतिनिधी): महाराष्ट्राची गौरवशाली मातृशक्ती आणि प्रेरणास्थान असलेल्या राजमाता जिजाऊ साहेब यांच्या १२ जानेवारी रोजी होत असलेल्या जिजाऊ जन्मोत्सवाला मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते शासकीय महापूजा व्हावी, तसेच सिंदखेडराजा तालुक्यातील वैष्णवगड येथे आषाढी एकादशीनिमित्त जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा व्हावी, अशी महत्त्वपूर्ण मागणी आमदार मनोज कायदे यांनी विधानसभेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली आहे.
जिजाऊ जन्मोत्सव: मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीची मागणी
१२ जानेवारी रोजी सिंदखेडराजा येथे राजमाता जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त जगभरातून आणि राज्यभरातून लाखो जिजाऊ भक्त, महिला मंडळे, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी आणि वारकरी मोठ्या उत्साहात व श्रद्धेने अभिवादन करण्यासाठी येत असतात. या प्रसंगी होणाऱ्या सोहळ्याला शासकीय स्वरूप देण्याची मागणी सिंदखेडराजा नगरीचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अड नाझेर काजी यांनी गेल्या दहा वर्षापासून सातत्याने ही मागणी करत असल्याचे विधानसभेत प्रकर्षाने केली आहे. आमदार कायदे यांनी आपल्या मागणीत म्हटले आहे की, ज्याप्रमाणे पंढरपूर येथे आषाढी एकादशीला मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते शासकीय महापूजा केली जाते, त्याच धर्तीवर सिंदखेडराजा येथील जिजाऊ जन्मोत्सवाला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा करण्यात यावी. यामुळे महिला सक्षमीकरणाला मोठी चालना मिळेल. तसेच, राजमाता जिजाऊंच्या प्रेरणादायी कार्याचा आणि चारित्र्याचा व्यापक प्रचार होण्यास मदत होईल. महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेला यामुळे शासनाची अधिकृत मान्यता मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
वैष्णवगड येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते शासकीय पूजेची मागणी याशिवाय, आमदार कायदे यांनी श्रीक्षेत्र वैष्णवगड येथील आषाढी एकादशीच्या सोहळ्यालाही शासकीय महत्त्व देण्याची मागणी केली. दरवर्षी लाखो भक्तांच्या उपस्थितीत येथे भव्य सोहळा पार पडतो. या मंदिरात आषाढी एकादशीला बुलढाणा जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी विधानसभेत केली.
जिजाऊ भक्तांची ही तीव्र इच्छा आहे की, राजमाता जिजाऊंच्या जन्मोत्सवाला आणि वैष्णवगड येथील आषाढी पूजेला शासकीय महत्त्व प्राप्त व्हावे. या मागणीमुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक वर्तुळात एक नवा अध्याय सुरू होण्याची शक्यता आहे.