ऑडी, टोयोटा आणि टाटाच्या गाड्यांच्या किमती घटल्या:जीएसटी कपातीमुळे वाहन कंपन्यांकडून मोठी घोषणा

जीएसटी काउन्सिलने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे वाहन क्षेत्रात मोठा बदल झाला आहे. काउन्सिलने ४ मीटर लांब आणि १२०० सीसी इंजिनपर्यंतच्या गाड्यांवरील जीएसटी दर २८ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. त्याचबरोबर उपकर देखील रद्द केला आहे. ऑडी इंडियाने सर्व गाड्यांच्या किमतीत २.६ लाख ते ७.८ लाख रुपयांपर्यंत कपात केली आहे. ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंग ढिल्लों यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांच्या मते, हा निर्णय उद्योगाच्या वाढीसाठी फायदेशीर ठरणार आहे. टोयोटा किर्लोस्करने फॉर्च्युनर वाहनाच्या किमतीत ३.४९ लाख रुपयांपर्यंतची कपात केली आहे. कंपनीच्या इतर वाहनांमध्ये १ लाख ते साडेतीन लाख रुपयांपर्यंत किंमत कमी केली आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटर्सचे उपव्यवस्थापकीय संचालक स्वप्नेश आर. मारू यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. टाटा मोटर्स कंपनीने आपल्या विविवध वाहनांच्या किंमतीत ६५ हजार ते १.४५ लाख रुपयांपर्यंत दर कपात केली आहे. जीएसटी दरकपातीचा फायदा ग्राहकांना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या २२ सप्टेंबरपासून नवे दर पत्रक लागू होईल. यासंदर्भात अधिक माहिती देताना कंपनीच्या प्रवासी वाहन विभागाचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्रा म्हणाले की, या सुधारणा पुढील पिढीच्या जीएसटीच्या दृष्टीकोनाचे प्रतिबिंब आहेत. सुलभ केलेली जीएसटी चौकट केवळ करदर सुलभीकरणापुरती मर्यादित नसून संरचनात्मक सुधारणा करून भारताच्या आर्थिक वातावरणातील दीर्घकालीन विश्वास दृढ करते. ईव्हीवर (इलेक्ट्रिक वाहनांवर) ५ टक्के जीएसटी दर कायम ठेवण्याचा जीएसटी परिषदेचा निर्णय हा दूरदर्शी पाऊल आहे, जो भारताची शाश्वत, शून्य-उत्सर्जन गतिशीलतेबद्दलची बांधिलकी अधोरेखित करतो आणि दीर्घकालीन धोरणात्मक स्थिरतेचा संदेश देतो. लहान वाहनांवरील जीएसटी १८ टक्के पर्यंत कमी केल्यामुळे वैयक्तिक गतिशीलता अधिक परवडणारी होईल आणि समाजाच्या व्यापक घटकांना उपलब्ध होईल. या निर्णयामुळे सामान्य नागरिकांना वाहने खरेदी करणे सोयीस्कर होणार आहे. बाजारपेठेतील विश्वास वाढणार असून गुंतवणुकीला चालना मिळणार आहे. तसेच वाहन उद्योगाच्या वाढीलाही मदत होणार आहे. सणासुदीच्या काळात ग्राहकांना या कपातीचा थेट फायदा मिळणार आहे.