लातूरमधील आत्महत्येची घटना दुःखद:ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, कुणीही टोकाचे पाऊल उचलू नये – अजित पवार

ओबीसी आरक्षणाच्या चिंतेतून लातूर जिल्ह्यातील वांगदरी (ता. रेणापूर) येथील भरत महादेवराव कराड यांनी केलेल्या आत्महत्येबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. ही घटना ‘अत्यंत दुःखद आणि मन हेलावणारी’ असल्याचे सांगत, त्यांनी कराड यांच्या आत्म्याला श्रद्धांजली अर्पण केली. मराठा समाजाला आरक्षणाचा हक्क देतांना कोणत्याही परिस्थितीत ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, याची आम्ही पूर्ण खबरदारी घेत आहोत. त्यामुळे या संवेदनशील काळात कुणीही टोकाची भूमिका घेऊ नये, अशी विनंती अजित पवार यांनी केली आहे. मराठा आंदोलन मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनानंतर राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भातील जीआर देखील काढण्यात आला आहे. यामुळे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळणे सोपे झाले असून, त्यांना ओबीसीतून आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे. मात्र, हैदराबाद गॅझेटच्या जीआरवरून ओबीसी समाजात तीव्र नाराजी पसरली आहे. मराठा आरक्षणामुळे ओबीसींचे आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या निषेधार्थ लातूरच्या रेणापूर तालुक्यातील वागदरी येथील भरत महादेव कराड नामक एका 35 वर्षीय तरुणाने मांजरा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली. अजित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत भरत कराड याला श्रद्धांजली अर्पण केली. नेमके काय म्हणाले अजित पवार? लातूर जिल्ह्यातील वांगदरी (ता. रेणापूर) येथील श्री. भरत महादेवराव कराड यांनी ओबीसी आरक्षणाच्या चिंतेतून मांजरा नदीपात्रात उडी घेऊन जीवन संपवल्याची घटना अत्यंत दुःखद आणि मन हेलावणारी आहे. सर्वप्रथम त्यांच्या आत्म्यास मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. आपले सरकार सर्व समाज घटकांच्या न्याय व हक्कांसाठी कटिबद्ध आहे. मराठा समाजाला आरक्षणाचा हक्क देतांना कोणत्याही परिस्थितीत ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, याची आम्ही पूर्ण खबरदारी घेत आहोत. त्यामुळे या संवेदनशील काळात कुणीही टोकाची भूमिका घेऊ नये, अशी विनंती अजित पवार यांनी केली आहे. प्रत्येक समाजाच्या हितासाठी आम्ही काम करत असून कोणत्याही घटकावर अन्याय होणार नाही, हीच आमची भूमिका असल्याचेही ते म्हणालेत. या दुःखद प्रसंगी मी कराड कुटुंबीय आणि त्यांच्या आत्मीयांच्या दुःखात सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या कुटुंबाला हे दुःख सहन करण्याचं बळ देवो, हीच प्रार्थना, असे अजित पवार यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे. कराडचे बलिदान वाया जाणार नाही विजय वडेट्टीवार म्हणाले की, लातूर जिल्ह्यातील भरत कराड या 35 वर्षीय तरुणाने ओबीसी समाजाचे आरक्षण हिरावून घेऊ नये म्हणून आत्महत्या केली. सरकारने काढलेला जी आर ओबीसींना उध्वस्त करणारे आहे असे पत्र लिहून ओबीसींच्या लढ्यासाठी स्वतःचे बलिदान दिले आहे. ही वेदना देणारी घटना आहे. हा जी आर काढून सरकारने ओबीसींवर अन्याय केला आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही सांगते पण सरकार दिशाभूल करत आहे. या आत्महत्येला महायुती सरकार जबाबदार आहे. सरकारने काढलेला जी आर रद्द करा नाहीत तरुणांमध्ये जो राग निर्माण झाला आहे त्याचा उद्रेक होऊ देऊ नये.कराडचे बलिदान वाया जाणार नाही, जोपर्यंत जी आर रद्द होत नाही आणि घुसखोरी थांबत नाही त्यासाठी लढत राहू! तरुणांना आवाहन करत आहे आत्महत्या करू नये.