सामाजिक

लोकाभिमुख आणि पारदर्शक महसूल प्रशासनासाठी जिल्ह्यात 17 सप्टेंबरपासून ‘सेवा पंधरवडा’  

 बुलढाणा, दि. 12 : महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक होण्यासाठी पंतप्रधान राष्ट्रनेता नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत जिल्ह्यात ‘सेवा पंधरवडा’ राबविण्यात येणार आहे. या सेवा पंधरवड्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी गुरुवारी पूर्वतयारीचा आढावा घेतला.

जिल्हाधिकारी कार्यातयातील जिजाउ कक्षात झालेल्या या आढावा बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, अपर जिल्हाधिेकारी सुधीर खांदे, निवासी उपजिल्हाधिकारी सदाशीव शेलार, मुख्य वनसंरक्षक सरोज गवस, उपजिल्हाधिेकारी समाधान गायकवाड, डॉ. जयश्री ठाकरे, विविध विभागाचे प्रमुख, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकरी, तालुका आरोग्य अधिकारी (दुरदृष्य प्रणालीद्वारे) उपस्थित होते.

 

या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी ‘सेवा पंधरवडा’ राबविण्याबाबची रुपरेषा स्पष्ट केले. हा ‘सेवा पंधरवडा’ तीन टप्प्‌यात राबविण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने पहिल्या टप्प्यात पाणंद रस्ते विषयक मोहीम, दुसऱ्या टप्प्यात ‘सर्वांसाठी घरे’ उपक्रम आणि तिसऱ्या टप्प्यात नावीन्यपूर्ण उपक्रम राबहवण्यात येणार आहेत. या पंधरवड्यातील उपक्रम यापूर्वीपासून सुरू असले तरी या कालावधीत त्यांची मोहीम स्वरूपात युद्धपातळीवर अंमलबजावणी करावी. यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान, जिवंत सातबारा मोहीम, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान, संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजना, लोकअदालत, धरती आबा अभियान प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

 

तसेच जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त गावे, दत्तक गावे आणि तांडा समृद्धी योजनेंतर्गत गावांमध्ये जनजागृती कार्यक्रम, विविध शिबीर, रोजगार मेळावा, लोकअदालतीचे आयोजन करुन पात्र नागरिेकांना शासकीय सेवांचा लाभ मिळवून द्यावा. या पंधरवडयायच्या सुरुवातीला लोकप्रतिनीधींच्या उपस्थित ग्रामसभा आयोजित करावी. विविध शिबिरांच्या माध्यामातून शेतकरी, नागरिकांना फार्मर आयडी, आयुष्मान कार्ड वितरित करावे. तसेच ई-केवायसी, आधार नुतनीकरण, घरकुलाच्या रेतीसाठी ऑनलाईन नोंदणी या सुविधा तसेच लम्पी लसीकरण, टॅगींग, भोगवटादार जमीन वर्ग 2 मधून वर्ग 1 करणे आदी सुविधांचा लाभ मिळवून द्यावा. हा सेवा पंधरवडा यश्स्वीपणे राबविण्यासाठी उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकरी, तालुका आरोग्य अधिकारी, बँक व पोस्ट अधिकार यांनी समन्वयाने नियोजन करावे, अशा सूचना देखील जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी या आढावा बैठकीत दिल्या.

 

 सेवा पंधरवड्याचे तीन टप्पे

 

शासन निर्णयानुसार सेवा पंधरवडा तीन टप्प्यांमध्ये राबविला जाणार आहे.

 

पहिला टप्पा – पाणंद रस्ते विषयक मोहिम (17 ते 22 सप्टेंबर 2025)

 

या कालावधीत पाणंद/शिवार रस्त्यांना क्रमांक देणे आणि त्यांचे गाव नकाशावर चिन्हांकन करण्यावर भर द्यावा. जिल्ह्यातील पाणंद रस्त्यांचे मॅपिंग करावे. शिवरस्त्यांचे सर्वेक्षण करणे. निस्तार पत्रक व वाजिब उल अर्जामध्ये नोंद नसलेल्या रस्त्यांची नोंद घेणे. शेतरस्ते उपलब्ध करून देण्यासाठी संमतीपत्रे गोळा करणे. रस्ता अदालत आयोजित करून प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे. शेतरस्त्यांचे मोजमाप व सीमांकन करणे.

 

दुसरा टप्पा – ‘सर्वांसाठी घरे’ उपक्रम (23 ते 27 सप्टेंबर 2025)

सर्वसामान्य नागरिकांना घर मिळावे, या उद्देशाने ‘सर्वासाठी घरे’ या योजनेअंतर्गत शासनाने महत्त्वपूर्ण उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार भूमिहिन व बेघर कुटुंबांना घरे बांधण्यासाठी जमिनींची उपलब्धता तपासून घरकुलांसाठी शासकीय जमिनी कब्जेहक्काने प्रदान करणे. शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमांनुसार नियमानुकूल करणे. विकास आराखड्याशी सुसंगत जमिनींवरील गायरान नोंदी कमी करणे. सुसंगत नसलेल्या जमिनींसाठी आरक्षण बदल प्रस्ताव सादर करणे. तसेच पात्र लाभार्थ्यांना शासकीय जमिनींचे पट्टे वाटप करणे. रहिवासी प्रयोजनासाठी मंजूर जमिनींचे पट्टे वाटप करणे. खाजगी मिळकतधारक व अतिक्रमण नियमानुकूल केलेल्या मिळकतधारकांना पट्टे देणे.

 

तिसरा टप्पा – नावीन्यपूर्ण उपक्रम (28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025)

या कालावधीत स्थानिक गरजा व भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जाणार आहेत. यात आदिसेतू/ जनसंवाद, महाराष्टर जमीन महसूल अधिनियमांतर्गत पारीत आदेशांची पडताळणी, जिवंत सातबारा मोहिमेंतर्गत प्रकरणांचा निपटारा, लोक अदालत, धरती आबा अभियान, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान, संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजना राबहवण्यात येणार आहेत. यात लोकसहभागातून महसूल सेवांचा दर्जा उंचावण्याचे प्रयत्न करणे. स्थानिक पातळीवरील नवीन कल्पनांना प्रोत्साहन देणे.पारदर्शकतेसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा अधिक वापर करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केल्या.

 

0000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button