हिंगोली जिल्ह्यात धुवाँधार पाऊस:गुंडा शिवारात ओढ्याच्या पाण्यात दोन महिला वाहून गेल्या, प्रशासनासह गावकऱ्यांकडून शोध सुरू

हिंगोली जिल्ह्यात शुक्रवारी ता. १२ दुपारपासून विविध ठिकाणी धुवाँधार पाऊस झाला असून, वसमत तालुक्यातील गुंडा शिवारात ओढ्याच्या पाण्यात दोन महिला वाहून गेल्या आहेत. त्यांचा शोध सुरु करण्यात आला आहे. हिंगोली जिल्ह्यात आज दुपारपासून ढगाळ वातावरण होते. त्यानंतर वादळीवाऱ्यासह पावसाला सुरवात झाली. वसमत, हिंगोली तालुक्यात धुवाँधार पाऊस झाल्यामुळे नदी, नाल्यांना पूर आला असून, वसमत तालुक्यात अनेक ठिकाणी पुराच्या पाण्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. वसमत ते काकबन या शिवारात पाणी नाल्याच्या पुलावरून वाहात असल्यामुळे हा रस्ता बंद झाला आहे. याशिवाय रिधोरा भागातही ढगफुटी सदृष्य पाऊस झाला आहे. या पावसामुळे शेतांमधून पाणीच पाणी झाले असून नदी, नाल्या काठच्या पुराच्या पाण्यामुळे आखाड्यावरील शेती साहित्य वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. दोन महिला पुराच्या पाण्यात वाहून गेल्या दरम्यान, वसमत तालुक्यातील गुंडा शिवारात गयाबाई आंबादास सारोळे (६०) व सखुबाई विश्वनाथ भालेराव (५५) ह्या इतर महिलांसोबत शेतात कामासाठी गेल्या होत्या. सायंकाळच्या सुमारास मोठा पाऊस येत असल्यामुळे त्यांच्यासह इतर महिला शेतातून घराकडे निघाल्या होत्या. यावेळी गुंडा शिवारातील ओढ्यावर पुराचे पाणी आले. या पाण्यातून त्या घराकडे येत असताना गयाबाई व सखुबाई ह्या दोघींना पाण्याचा अंदाज आलाच नाही. काही वेळातच त्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. प्रशासनाकडून शोधकार्य सुरू दरम्यान, या दोघी पुराच्या पाण्यात वाहून जात असताना काही महिलांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने त्यांना वाचविण्याचे प्रयत्न केले. मात्र काही वेळातच त्या वाहून गेल्या. या घटनेची माहिती मिळाताच जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी तातडीने पथकाला घटनास्थळी रवाना केले. उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार शारदा दळवी यांच्यासह महसूल विभागाचे पथक घटनास्थळी ठाण मांडून आहेत. या शिवाय औंढा पोलिस ठाण्याचे पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे. या दोघींचा शोध सुरु करण्यात आला असून रात्रीमुळे शोध कार्यात अडचणी येत आहे. शनिवारी ता. १३ पहाटेपासून त्यांचा पुन्हा शोध सुरु केला जाणार असल्याचे महसूलच्या सूत्रांनी सांगितले. गुंडा शिवारातून वाहणारा ओढा गुंडा शिवारातून निघून पुढे आरळ, तेलगाव नदीकडे जातो. त्यामुळे त्या भागातही शोध घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.