संजय राऊतांना नेपाळ परिस्थितीवरील वक्तव्य भोवणार:शिंदेच्या शिवसेनेचे पोलिस आयुक्तांना पत्र, गुन्हा दाखल करण्याची मागणी

शिवसेनेचे (शिंदे गट) नेते संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. नेपाळमधील हिंसाचारासारखी परिस्थिती भारतातही निर्माण होऊ शकते, या राऊत यांनी केलेल्या विधानावर आक्षेप घेत, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या एका शिष्टमंडळाने त्यांच्या विरोधात मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम 150 नुसार राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी मुंबईचे पोलिस आयुक्त देवेन भारती यांची भेट घेतली आणि संजय राऊत यांच्यावर कारवाईची मागणी करणारे लेखी निवेदन दिले. यावेळी खासदार मिलिंद देवरा, आमदार तुकाराम काते, शिवसेना सचिव संजय मोरे, माजी खासदार संजय निरुपम, उपनेत्या शीतल म्हात्रे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. शीतल म्हात्रेंनी संजय राऊतांवर केले गंभीर आरोप भारताचा शेजारी देश नेपाळमधील तरुणाई सरकार विरोधात रस्त्यावर उतरली आहे. नेपाळ हिंसाचाराचे समर्थन करणारे आणि तशी परिस्थिती भारतात निर्माण होईल, असे देशविरोधी मत सोशल मीडियावर व्यक्त करणाऱ्या संजय राऊतांवर तातडीने कारवाई करण्याची आवश्यकता आहे, असे शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी म्हटले. शीतल म्हात्रे म्हणाल्या, संजय राऊत सारखी व्यक्ती जे बोलते त्यामुळे शहरात बॉम्बच्या अफवा पसरणे, धमकीचे कॉल येणे असे प्रकार घडू शकतात. त्यामुळे पोलिसांनी राऊत यांची चौकशी करणे आवश्यक आहे. राऊत पत्राचाळ घोटाळ्यात तुरुंगात जाऊन आलेले आहेत. राऊत हे मनोरुग्ण झाले आहेत. राऊत सातत्याने सोशल मीडियावर समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य करतात, देशाविरोधी गरळ ओकतात, त्यामुळे राऊत यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे अशी मागणी शिष्टमंडळाने पोलिस आयुक्तांकडे केल्याची माहिती शीतल म्हात्रे यांनी दिली आहे. आता मुंबई पोलिस आयुक्त या तक्रारीची गंभीर दखल घेणार का, ते राऊत यांना समज देणार की त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नेमके काय म्हणाले होते संजय राऊत? ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नेपाळमधील परिस्थितीचा दाखला देत, अशी परिस्थिती कोणत्याही देशात उद्भवू शकते, असे म्हटले होते. त्यांनी सोशल मीडियावर एका पोस्ट केली होती. त्यामध्ये, “Nepal today! ये स्थिती किसी भी देश मे पैदा हो सकती है! सावधान! भारत माता की जय! वंदे मातरम!”, असे म्हटले होते. त्यासोबतच त्यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग केले होते. या ट्विटसोबत त्यांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला होता, “आपल्या हक्कांसाठी जागा झालेला युवक असा दिसतो,” असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे केंद्र सरकारवर टीका केली होती.