Uncategorized

छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडलेल्या भारतातील पहिल्या विधीज्ञ साहित्य संमेलनात सिंदखेडराजा कवयित्री अ‍ॅड. वर्षाताई कंकाळ यांची गगनभेदी कविता!

संभाजी नगर/प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर येथे 26 जुलै रोजी इतिहासात प्रथमच आयोजित भारताच्या पहिल्या विधीज्ञ साहित्य संमेलनात सिंदखेडराजा (जि. बुलढाणा) येथील सुप्रसिद्ध कवयित्री व विधीतज्ञ अ‍ॅड. वर्षाताई कंकाळ यांनी सादर केलेल्या प्रभावी कवितेने संमेलनात उपस्थित मान्यवरांना आणि प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. ‘चळवळीचे काय झाले?’ या शीर्षकाखाली सादर झालेल्या कवितेतून त्यांनी सध्याच्या समाजव्यवस्थेवर आणि हरवलेल्या क्रांतिकारी विचारांवर तीक्ष्ण प्रहार करत विचारांना चटका लावला.

या संमेलनास सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती मा. अभय ओक, न्यायमूर्ती मान. प्रसन्न वराळे, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मा. मनीष पितळे, कुलगुरू डॉ. बिंदू रोनाल्ड यांच्यासह देशभरातील नामांकित विधीज्ञ, साहित्यिक आणि मान्यवरांची उपस्थिती होती.

कवयित्री अ‍ॅड. कंकाळ यांनी आपल्या कवितेतून प्रश्नांची सरबत्ती करत आजच्या समाजजीवनातील वास्तव अधोरेखित केले:
“मार्गावर चर्चा होतात हल्ली समृद्धीच्या, गावातील गल्ली-बोळीचे काय झाले?”
“टाळ्या वाहवासाठी चालते मनोरंजन येथे पण, विचारांच्या त्या चळवळीचे काय झाले?”
“पेटल्यावर आजकाल रडते मेणबत्ती ही, त्या धगधगत्या क्रांतीच्या मशालीचे काय झाले?”

त्यांच्या या प्रभावी आणि हृदयाला भिडणाऱ्या सादरीकरणाने सभागृहात प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला. उपस्थित दिग्गज मान्यवरांनी अ‍ॅड. कंकाळ यांच्या सादरीकरणाचे कौतुक करत त्यांना अभिनंदन दिले.

बुलढाणा जिल्ह्याच्या सांस्कृतिक आणि साहित्यिक वैभवासाठी हा क्षण अभिमानास्पद ठरला आहे. सिंदखेडराजा येथील कवयित्री अ‍ॅड. वर्षाताई कंकाळ यांनी संमेलनात बुलढाणा जिल्ह्याचा झेंडा उंचावल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button