संभाजी ब्रिगेड कडून शेतकऱ्यांच्या विविध समस्यां संदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन मागण्या पूर्ण न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात आक्रमक आंदोलन करण्याचा जिल्हाध्यक्ष अमर पाटील यांचा इशारा

नांदुरा प्रतिनिधी ( भागवत दाभाडे)
शेतकरी कर्जमाफी,उस दर,कापूस दर,दुध दर, मराठा, धनगर व इतर आरक्षण आदि ज्वलंत विषयांबाबत तत्काळ निर्णय घ्या अन्यथा संपूर्ण महाराष्ट्राभर लक्षवेधी आंदोलन करू असे संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष शिवश्री मनोज आखरे यांनी जाहीर केले.याच पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेड बुलढाणा जिल्हाध्यक्ष शिवश्री अमर रमेश पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले.यात नमूद आहे की महाराष्ट्रामध्ये आपण सत्तेत येवून मोठा कालावधी झाला असुन विधानसभा निवडणूकी दरम्यान शेतकरी कर्जमाफी, उसाचा दर, दूधाचा दर तसेच मराठा, धनगर व इतर जात समूहाच्या आरक्षण आदी विषयांबाबत जनतेला व मतदारांना आश्वाशित केले होते. दरम्यान आपण भरघोस मंतांच्या आधाडीने सत्तेवर आलात व मुख्यमंत्री झालात. मात्र या गंभिर विषयांबाबत आपण चलढकल करत आहात.
आज महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकरी
अत्यंत कठिण परस्थितीत असून कर्जबाजारी झाला आहे. महाराष्ट्रात दर दिवशी सरासरी तीन शेतकरी कर्जाच्या विळख्यात असल्याने आत्महत्या करतोय. आपण निवडणुकीत कर्जमाफी बाबत आश्वाशित केल्याने तो मोठ्या अपेक्षेने याबाबत आपणाकडे आस लावून बसला असून आपले सहकारी मंत्री याबाबत उडवाउडवीची उत्तरे देऊन एक प्रकारे शेतकऱ्यांची चेष्टा करत आहेत. आपना कडून आम्हाला शेतकरी कर्जमाफीची अपेक्षा असल्याने याबाबत आपण तातडीने निर्णय घेऊन शेतकरी बळीराजाला सुखी करावे.
आज महाराष्ट्रभर मराठा, धनगर व इतर काही जात समूह आरक्षणाची मागणी करत असून याबाबत समाजबांधव अत्यंत आक्रमक असून त्यांच्या भावना अत्यंत तिव्र आहेत. आपले काही सहकारी मंत्री महोदय सातत्याने या विषयावर महाराष्ट्रात विक्षिप्त वक्तव्य करून वातावरण बिघडवत आहेत.सातत्याने या विषयावर जातीय तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न करत असल्यागत सत्ताधारी वक्तव्य करत असून राज्याचे प्रमुख म्हणून आपण जबाबदारीने हा विषय निकाली काढावा. मराठा आरक्षणा आडून मराठा ओबीसी संघर्ष निर्माण करून प्रश्न तेवत ठेवण्याचे काम काही सत्ताधारी करत आहेत.या पृष्ठभूमीवर आपण याबाबत निर्णय घेऊन मार्ग काढावा.मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढतानाच इतरांना त्यामुळे अडचन होणार नाही याबाबत आपण काळजी घ्यावी. ती आपली जबाबदारी आहे.
महाराष्ट्रातील शेतकरी मुख्यतः उस व दुध व्यवसाय यावर मोठ्या प्रमाणात गुजरान करत आहे मात्र याबाबत अत्यंत गंभिरपणे शेतकऱ्यांची लूट होत आहे व एफ.आर.पी. प्रमाणे ठरलेला उसदर सहकारी अथवा खाजगी कारखानदार देत नाही. त्यातही सर्वच कारखानदार दोन-दोन महिने पेमेंट देत नाहीत तसेच जे देतात त्यातही कवड्या-रेवड्या करून देतात व याद्वारे कोट्यावधी रुपयांची शेतकऱ्यांची लूट साखर कारखानदार करतात तसेच जवळपास सर्वच कारखान्यावरील जे वजन काटे आहेत ते दोषपूर्ण असून प्रत्येक गाडीत १ ते २ टन उसाची चोरी या काटा मारण्यातून करून कारखानदार प्रतीवर्षी सुमारे दोन ते तीन कोटी रक्कम चोरी करत ऊस उत्पादकांना फसवत आहेत.तसेच दुधाला दूधउत्पादन खर्चावर आधारीत दर दिला जात नसून यामागे फार मोठे षडयंत्र असून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात भेसळीच दूध अल्प दरात तयार करून विकले जाते व प्रत्यक्षात दूधउत्पादकांना कमी दर देऊन दूध उत्पादन वाढणार नाही याची काळजी या षडयंत्राद्वारें घेतली जाते. यासाठी अत्यंत प्रामाणीक व कर्तव्यदक्ष यंत्रने मार्फत या भेसळखोरावर कारवाई करून स्वच्छ व शुद्ध दूध निर्मितीसाठी दूध उत्पादकांना प्रोत्साहन द्यावे. या भेसळयुक्त दुधामुळे अनेक दुर्धर आजार होत आहेत व याचा मृत्युदर खूप मोठा आहे. यास्तव आपनास नम्र विनंती की महाराष्ट्रात कडक कायदा करून उसाला एफ.आर.पी. प्रमाणे दर देऊन सात दिवसांत पेमेंट देण्याचे आदेशित करावे. प्रत्येक कारखान्याचा वजन काटा पारदर्शक असावा याबाबत कायदा करावा, दुध भेसळीबाबत सुद्धा कठोर पाऊले उचलत भेसळ बंद करून गायीच्या दुधाला ५० रुपये व म्हशीच्या दुधाल ६० रुपयांच्या वर दर जाहीर करावा.
वरील निवेदन व त्यातील गंभीर मुद्द्यानुसार आपण तत्काळ निर्णय घ्यावा. या बाबत संभाजी ब्रिगेड आपले लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्रभर दि २१/०८/२०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी ११ ते ४ या कालावधीत लक्षवेध आंदोलन करणार असुन याद्वारे या महत्त्वाच्या विषयावर आपले लक्ष वेधणार आहोत असे सदर पत्रात नमूद आहे.हे पत्र बुलढाणा जिलाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.यावेळी संभाजी ब्रिगेड बुलढाणा जिल्हाध्यक्ष शिवश्री अमर रमेश पाटील,नांदुरा तालुका संपर्क प्रमुख सचिन गणगे श्रीनिवास पाटील व दत्ता राऊत उपस्थित होते.