रताळीच्या रस्त्यावर ‘मृत्यूचा सापळा’ – जिवंत विद्युत तारेचा थरार, पण वीज विभाग ‘डोळे मिटून झोपलेला!’

सिंदखेड राजा/प्रतिनिधी
आज पहाटे ५ वाजता साखरखेर्डा ते अंत्री झाल्टे मार्गावर राताळी गावाजवळ एक अत्यंत धोकादायक आणि थरारक प्रकार घडला. वीज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे जीवघेणा प्रसंग उद्भवू शकला होता.
गावाजवळील डीपीवरील जिवंत वीज प्रवाह वाहणारी तार अचानक तुटून थेट रस्त्यावर आडवी पडली. हे ठिकाण सकाळच्या वेळेस शाळकरी विद्यार्थी, शेतकरी, वाहनचालक यांची वर्दळ असलेला रस्ता होता. कुणीही या तारेच्या संपर्कात आला असता, तर घातपात अटळ होता!
घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तत्काळ वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना फोन केले. परंतु एकाही जबाबदार अधिकाऱ्याचा किंवा कर्मचाऱ्याचा मोबाईल फोन सुरू नव्हता!
अत्यावश्यक सेवेमध्ये येणाऱ्या वीज खात्यातील ही झोप म्हणजे निष्काळजीपणाचा कळस आहे. लोकांच्या जिवाला धोका निर्माण झाला असतानाही, प्रशासन गाढ झोपलेले असणे ही गोष्ट केवळ दुर्दैवीच नव्हे, तर तीव्र निषेधार्ह आहे!
गावकऱ्यांचा प्रखर संताप व्यक्त होत असून, ‘मृत्यूच्या दारातून वाचलो, पण उद्या कोण वाचणार?’ असा सवाल उपस्थित होत आहे.
तात्काळ चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यांवर कडक शिस्तभंगाची कारवाई झाली पाहिजे, ही ग्रामस्थांची आग्रही मागणी आहे.